अकोला (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान राज्यभर वीज बिले वाढून आली. यासंदर्भात विविध संघटनांकडून अनेक आंदोलने देखील करण्यात आली. याबाबत उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरणे प्रत्येकासाठी अनिवार्य असेल असे सांगितले. याचसंदर्भात, ‘वीज बिल भरण्याची सक्ती होत असेल तर कोणीही वीज बिल भरू नये. ज्यांची वीज कापल्या जाईल त्यांची वीज जोडून देण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेईल’, अशी भूमिका स्पष्ट करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे.

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, वीज बिलासंदर्भात सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने अकोल्यात आंदोलन केले होते. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे कोणीही वीज बिल भरू नये, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्यासह वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे,गजानन गवई, जि.प. सदस्य रामकुमार गव्हाणकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, पराग गवई,विकास सदाशिव आदी उपस्थित होते.