दिल्ली (वृत्तसंस्था) : मॅच फिक्सिंग करुन भाजपा निवडणूक जिंकली आणि त्यांनी आपलं संविधान बदललं तर या देशात आग लागेल, अशी टीका कॉंग्रस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून केलेल्या शक्तीप्रदर्शनावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, यंदाची निवडणूक ही केवळ मतदानाची निवडणूक नाही तर संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे, असं राहुल गांधींनी नमूद केलं. काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. नेत्यांना पैसे देऊन धमकावलं जात आहे. सरकारं पाडली जात आहेत. नेत्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. ही मॅच फिक्सिंग केवळ नरेंद्र मोदी करत नसून मोदी आणि काही ३ ते ४ अब्जाधीश एकत्र येऊन हे करत आहेत, हेच सत्य आहे, असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकावर टीका केली.
सध्या भारतात आयपीएलच्या धर्तीवर राहुल गांधी म्हणाले, आपल्या समोर लोकसभेच्या निवडणुका आहेत. या सामन्याचे पंच मोदीजींनी निवडले आहेत. आमच्या २ खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकलं आहे. या निवडणुकीमध्ये मोदीजी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ४०० काय १८० जागांहून अधिक जागाही मिळवता येणार नाही. मोदींनी ४०० पारची घोषणा दिली आहे. मात्र, ईव्हीएम, सोशल मीडिया आणि अशी मॅच फिक्सिंग केली नाही तर भाजपाला १८० हून अधिक जागा जिंकता येणार नाहीत, असा दावाही राहुल गांधींनी आपल्या भाषणात केला.
‘लोकशाही वाचवा रॅली’च्या माध्यमातून कोण्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी नाही तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते या रॅलीमध्ये उपस्थित राहिले होते.