मुंबई – शरद पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. आता अजित पवारांनी शरद पवारांच्या या नक्कलवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले,’ असं अजित पवार म्हणाले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, मला खूप वेदना झाल्या अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
‘मी रात्र-दिवस एक करुन, सगळीकडे जाऊन निवडणुकीत काम केलं. शरद पवारांना ज्या उंचीवर देश बघतो, महाराष्ट्र बघतो. त्यांनी मुलाप्रमाणे असणाऱ्याची नक्कल केली, हे अनेकांना आवडलेलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं. मी रुमाल काढला नव्हता, त्यांनी रुमाल काढला. मी आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. कधी-कधी असं होतं. पण माझं रडणं नैसर्गिकपद्धतीने झालं,’ असं अजित पवारांनी सांगितले.