मुंबई ( प्रतिनिधी ) : तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या 2’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
पहिल्या भागातील दमदार कथेनं आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापरानं प्रेक्षकांना भूरळ घातली होती. मारुतीरायानं दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे आणि हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड यांचा ‘हुप्पा हुय्या 2’ रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्यदिव्य आणि स्टायलिश ट्रीटमेंटनं सज्ज होणार आहे. पहिल्या पार्टमध्ये सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता लागली आहे.
दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘हुप्पा हुय्या 2’बाबत बोलताना सांगितलं की, “हुप्पा हुय्या 2’ हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल, असा विश्वास मला आहे. आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कटतेनं आणि भव्यदिव्य पद्धतीनं साकारणार आहोत.”
आता ‘हुप्पा हुय्या 2’च्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.