मुंबई – सध्या देशात राज्यसभा निवडणुकीचं पडघम वाजत आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दररोज जवान शहीद होत आहेत, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं म्हणत संजय राऊतयांनी गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून ते आजपर्यंत किमान ४० जवानांच्या हत्या झाल्या आहेत. त्यांचं बलिदान आहे मला मान्य आहे, पण मी त्यांना हत्या म्हणतोय. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या हत्यांना जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. थोडी जरी लाज, चाड असेल , नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही राऊतांनी केली. देशाचे गृहमंत्री अत्यंत अपयशी ठरले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

अमित शाह अपयशी गृहमंत्री : संजय राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा हल्ला झाला. तिच विटी आणि तोच दांडू, तेच गृहमंत्री जे पाच वर्ष अपयशी ठरले. तेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, ज्यांच्याकडून काहीच ठोस कार्य झालं नाही. तेच अमित शाह, तेच राजनाथ सिंग, अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणात व्यस्त आहेत. अमित शाह देशाच्या निवडणुका, इतर उद्योग, रोखे जमवणं, धमक्या देणं याच्यात व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र व्यस्त आहेत. अमित शाह आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. अमित शाह यांनी आमच्या जवानांच्या हत्या करणाऱ्यांना देशाचं दुश्मन समजलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

अमित शाह यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी लावली ती ताकद जम्मू काश्मीर, मणिपूरमध्ये देशाच्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती, असं संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. हत्या म्हणतोय मी, बलिदान, हौतात्म्य मान्य आहे पण या हत्यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा. अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केला.