चेन्नई : पुण्यातील कल्याणनगरमधील हिट अँड रनची घटना अजूनही ताजी असताना आता चेन्नईत अशीच हिट अँड रनची घटना घडली आहे. काकांची कार घेऊन मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलामुळे अनेक लोकांचा जीव संकटात सापडला .कारवरील मुलाचं नियंत्रण सुटलं आणि कारचा अपघात मंगळवारी संध्याकाळी घडला.
अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले त्याचे मित्र आणि आरोपी मुलाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मिळालेल्या माहितीनुसार ,आरोपी मुलगा त्याच्या मित्रांसोबत जाम बाजारहून रोयापेट्टाला जात होता. कार त्याच्या काकांची होती. त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित एसयूव्ही कारनं दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कारनं ऑटोसह अन्य काही दुचाकींना धडक दिली. कारनं काही पादचाऱ्यांनादेखील उडवलं. अपघातानंतर आरोपी मुलानं कार सोडून पळण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला.लोकांनी या अपघाताची माहिती जाम बाजार पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीसह त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले.
आरोपी अवघ्या 14 वर्षांचा –
अपघातात एकूण तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाला गंभीर इजा झाली आहे. या अपघातात 5 दुचाकींचं नुकसान झालं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास भरधाव वेगातील कारनं दुचाकींना धडक दिली. या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. आरोपी मुलगा 14 वर्षांचा असून तो इयत्ता दहावीत शिकतो. पोलिसांना कार ताब्यात घेतली असून मुलाच्या पालकांना चौकशीसाठी बोलावलं आहे.