कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमांचे नियोजन केले जात आहे. पण आजचा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा कार्यक्रम आगळावेगळा होता. कळायच्या आधीच एचआयव्ही आई वडिलांचे छत्र हरवल्याने आलेले अनाथपण ,लग्नानंतर लगेचच लागण देऊन मरण पावलेला पती, वाटायला आलेले एकाकीपण,समाजाकडून होणारी अवहेलना.हे केवळ सहनच न करता जिद्दीने,न डगमगता,कुणी शिक्षण पूर्ण करून आर्मीत प्रवेश मिळवला,कोणी नर्सिंग केले,कोणी शिक्षिका,डॉक्टर,व्यावसायिक बनले तर एकीने नुकतेच टुरिझम चे शिक्षण पूर्ण झाल्यावर आता एअरपोर्टवर नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली.

साहस आणि जिद्दीची अशी अनोखी संघर्षमय उदाहरणे खंबीरपणे समाजासमोर येऊन आदर्श ठरावीत असे उद्गार उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एन के पी प्लस संस्थेमार्फत आयोजित विशेष कौतुक सोहळ्यात काढले. अशा व्यक्ती आत्मविश्वासाने समोर आल्यास समाजाचा संसर्गिताप्रती दृष्टिकोन बदलेल. असेही ते म्हणाले. एच आय व्ही सह जगत असलेल्या युवा मुलांना आणि विधवा महिलांना त्यांच्या या साहसी कर्तुत्वासाठी कौतुकाची थाप देऊन बळ दिले.

तसेच,त्यांनी पुढे 15 एच आय व्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना पुढील वर्षभर पोषक आहार पुरवण्याची जबाबदारी घेतली. आपला कठीण भूतकाळ कथन करताना नव्या आयुष्याची दिशा देणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अनेकजण भावनिक झाले.ए.आर.टी औषध प्रणाली वेळेत मिळत असल्याने आम्ही आता सामान्य निरोगी आयुष्य जगत आहेत.असेही त्यांनी कथन केले. सीपीआर हॉस्पिटलच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता थोरात यांनी एचआयव्ही संसर्गितांसाठी सामाजिक योजना मिळवून देण्यासाठी विहान करत असलेल्या परिश्रमाची प्रशंसा केली.

तसेच सर्व सत्कारमूर्तींसाठी भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या ,खरोखरच आज सत्कार झालेल्या व्यक्ती म्हणजे सकारात्मकतेचे जिवंत उदाहरण आहेत. “टेक द राइट्स पाथ” यंदाच्या या थीम ला अनुसरून एचआयव्ही सह जगणाऱ्या या युवा आणि महिला यांनी खचून न जाता खंबीरपणे आपल्या हक्कांचा मार्ग स्वीकारून सुखी आयुष्य जगत आहेत. यावेळेस तहसीलदार स्वप्नील पवार तसेच एनकेपी प्लस संस्थेच्या अध्यक्ष वैशाली बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साऊळ यांनी केले तर आभार सुश्मिता भाकवे यांनी मानले.अमित सावंत,आशिष खरबडे,सुनीता पाटील याचे सह संस्थेचे सर्व समुपदेशक क्षेत्रीय कार्यकर्ते उपस्थित होते.