कोल्हापूर (प्रतिनिधी) : आता सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहे. त्यात कडाक्याची थंडी असल्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम देखील दिसून येत आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते आणि साथीच्या आजारांची लागण झपाटयाने होत जाते. थंडी सुरु झाली की लोक आहारात बदल करतात.

काकडी, दही आणि इतर थंड पदार्थाचे सेवन करणे बंद करतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्यावर लगेच परिणाम होताना दिसतात. काकडी खाल्यामुळे शरीराला पाणी, फायबर्स, आणि पोषकतत्त्व मिळतात,ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रोजच्या आहारात काकडी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरात गारवा टिकून राहतो, शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात काकडी खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात.

डिहायड्रेशन कमी होते :

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीर डिहायड्रेड होऊन जाते ज्यामुळे सतत थकवा जाणवणे,अशक्तपणा आल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काकडीचे सेवन करावे.

वजन नियंत्रणात राहते :

वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक प्रयत्न करतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी भूकेवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात काकडीचे सेवन करावे.काकडीमध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.