मुंबई (प्रतिनिधी) : सन मराठी वाहिनी नेहमी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणत असते. सन मराठी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असते. तर अशातच सोशल मिडीयावर एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच सन मराठीवर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जुळली गाठ गं या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. तर सोशल मिडीयावर प्रोमोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद असल्याचं दिसत आहे.’जुळली गाठ गं’मुख्य भूमिकेत अभिनेत्री पायल मेमाणे ही’सावी’नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
मुख्य भूमिकेबद्दल व्यक्त होत पायल म्हणाली की, मी ‘सन मराठी’वर काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेसाठी मला प्रॉडक्शन मधून कॉल आला. ऑडिशन, लुकटेस्ट या पद्धतीनेच माझं सिलेक्शन झालं. या मालिकेत मी सावी हे मुख्य पात्र साकारत आहे. जेव्हा मला सावीच्या स्वभावाबद्दल समजलं तेव्हा मी तिच्या प्रेमातच पडली. सावी ही इन्फ्लुएन्सर आहे. कोल्हापूरमधील सगळ्याच चविष्ट पदार्थांचं ती व्हिडीओ करून युट्युबवर अपलोड करते. बिनधास्त,मनमोकळी,अन्याय सहन न करणारी असा सावीचा स्वभाव आहे.”
पुढे ती म्हणाली की,”मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलचं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात त्या पुढे पोहचल्या पाहिजेत. लग्नानंतर मुलींचं आयुष्य बदलतं पण स्त्रियांना बंधनात न अडकवता त्यांना मोकळीक दिली पाहिजे. खेड्यागावात अजूनही लग्नानंतर स्त्रिया फक्त घरातलीच काम करतात पण असं नाही झालं पाहिजे. लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर खऱ्या अर्थाने सुरु होत. ही मालिका याच विषयावर आधारित आहे.जस सावीला तिच्या घरी जितकी मोकळीक दिली गेलीये तशीच मोकळीक तिला सासरी मिळेल का? सावी सासरच्या मंडळींचे विचार बदलू शकेल का? सावीची गाठ कोणाबरोबर जुळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.