नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे 25 मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता असून हे वादळ 26 मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात पोहोचेल. या काळात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्याचबरोबर पुढील पाच दिवसांत उत्तर-पश्चिम भारत, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 24 मे पर्यंत दक्षिण भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर केरळमध्ये 23 मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांच्या हवामानाबाबत बोलायचे झाले तर पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू विभाग, हरियाणा, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली. राजस्थानच्या बारमेरमध्ये काल सर्वाधिक 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. केरळ, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार, बिहार, पश्चिम बंगाल, दक्षिण अंतर्गत कर्नाटक भागात मुसळधार पाऊस झाला.
‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान खात्याने येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसांत केरळ, माहे, लक्षद्वीप, अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल येथे हलका ते मध्यम पाऊस, गडगडाट इ. याशिवाय अंदमान आणि निकोबारमध्ये पुढील सात दिवस जोरदार पाऊस पडणार आहे.