रांगोळी (प्रतिनिधी ) : श्रमसंस्कार शिबिरामुळे मन मनगट मेंदू बळकट होतो जी व्यक्ती समाजात काम करायला व श्रम करायला लाजते ती जीवनात कधीच यशस्वी होत नाही.असे प्रतिपादन चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे काॅलेज हुपरी प्राचार्य विजय पाडळकर यांनी केले. रांगोळी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे काॅलेज हुपरी यांचे वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते.
युवा उद्योजक अमित गाट, लोकनियुक्त सरपंच संगिता नरदे उपसरपंच शिवाजी सुर्यवंशी यांचे हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घघाटन करण्यात आले.पाडळकर म्हणाले राष्ट्राची एकता निर्माण व्हावी देशसेवेसाठी तरुण झाले पाहिजेत व जातीयता नष्ट होण्यासाठी तसेच गावचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले.२९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी अखेर शिबिर घेण्यात येणार आहे यामध्ये लेक वाचवा, रस्ता दुरुस्ती, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबीर, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, जलसाक्षरता, राष्ट्रीय एकात्मता असे उपक्रम राबविले जाणार आहेत.तसेच व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण कमते सुदर्शन पाटील सदस्या अश्विनी जंगले संध्या हवालदार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.