मुंबई – देशातील नामवंत व्यक्ती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं पुढील महिन्यात लग्न होणार असून त्याची धूम-धडाक्यात तयारी सुरू आहे. अंबानींच्या या लग्नाची जगभर उत्सुकता लागून राहिली आहे. गेले कित्येक महिने झाले या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नापूर्वी काही फंक्शन्स मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडली. तर गेल्या महिन्यात 29 मे ते 1 जून रोजी इटली येथे क्रूझवरही अंबानी कुटुंबातर्फे मोठी पार्टी देण्यात आली. या सोहळ्यात अंबानी, मर्चंट कुटुंबासह सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. एकंदरच अनंत-राधिकाचं लग्न खूप चर्चेत आहे.

अनंत अंबानी हा 12 जुलै रोजी राधिका मर्चेंटशी लग्न करणार आहे. 12 जुलै रोजी मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये ते दोघं सप्तपदी घेणार आहेत. त्यांचं लग्न हे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला झालेले त्यांचे प्री-वेडिंग पार्टी… आता त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा रंगली आहे. अनंत आणि राधिका यांचा विवाह 12 जुलै रोजी पार पडणार असून देशभरातील नामवंत व्यक्ती, उद्योजक, सेलिब्रिटी या विवाहासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याच दरम्यान अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेची झलक समोर आली असून ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. इन्स्टाग्रमावरही त्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

या लग्नपत्रिकेचा एक व्हिडीओ समोर आला असून तो व्हिडीओ सुरू होताच एक रेड कलरचा बॉक्स दिसतो. तो उघडल्यावर त्यात आतमध्ये एक चांदीचं मंदिर दिसतं. त्या मंदिरात हिंदू देव भगवान शिव, गणेश आणि श्रीरामांची सोन्याची मूर्ती आहे. या लग्नाच्या आमंत्रणासोबत एक चांदीची पेटीही होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिका ही भक्ती आणि परंपरेचा मेळ असलेली आहे. लग्नपत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.युजर्सनी देखील या व्हिडीओवर तूफान कमेंट्स केल्या असून जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.