मुंबई ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूरच्या विकासावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानुसार आज दि.२४ रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन आले होते. या बैठकीत दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेवून हद्दवाढीबाबत निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

याबैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव १ असीमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव २ के एच गोविंदराज, महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे, मस्कर, संजय चव्हाण आदी कोल्हापूर महानगरपालिका आणि संबधित अधिकारी उपस्थित होते.