कोल्हापूर : गोकुळने आपल्या गुणवत्तेचा जोरावर पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. पारंपरिक दुग्ध व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम गोकुळनं केलं आहे. याचा राज्यातील इतर सहकारी संस्थांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त अजित पवार यांनी काढले.
दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघास सदिच्छा भेट दिली. यानिमित्त गोकुळ परिवाराच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक मंडळाच्या उपस्थितीत ताराबाई पार्क कार्यालय इथं सत्कार करण्यात आला. पवार म्हणाले की, शासनाच्या दुग्ध व्यवसायासंबंधी विविध योजना गोकुळने यशस्वीपणे राबविल्या आहेत. विदर्भात ज्याप्रमाणे दूध व्यवसाय वाढीसाठी ६ हजार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी गोकुळने पुढाकार घ्यावा.
मुंबई येथील आरे डेअरीचे स्टॉल गोकुळने चालवण्यास घेतले पाहिजेत. आमदार सतेज डी पाटील म्हणाले, दुग्ध व्यवसायासंबंधी एन.डी.डी.बी, आर.के.व्ही.वाय. आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना शासनमार्फत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचतील हा प्रयत्न आपल्या दुग्धविकास विभागाच्या माध्यमातून आपल्या मार्फत व्हावा. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला एक चांगली दिशा मिळेल.
माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील –चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, चेतन नरके, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटी, सहा.निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,नामदेव दवडते व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.