कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जिल्ह्यातील जनावरांना सामूहिक गोचिड निर्मुलन आणि मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम चालू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचिड निर्मुलन तसेच मोफत थायलेरीया लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी राधानगरी तालुक्यातील मौजे चांदेकरवाडी येथे या मोहीमेच्या उद्घाटनावेळी केले.
अरुण डोंगळे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये सध्या थायलेरीया (गोचिड ताप) हा आजार जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे, या आजाराचा प्रसार गोठ्यातील गोचिडामुळे होतो परिणामी अशी जनावरे कायम स्वरूपी निकामी होतात. त्यांच्या दूध उत्पादन व प्रजनन शक्तीवर मोठा परिणाम होत असल्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोकुळने गोचिड निर्मुलन व थायलेरीया लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
यासाठी थायलेरीया लस संघाने मोफत उपलब्ध केली असून दूध उत्पादकांनी आपला गोठा, गोठ्यातील सर्व जनावरांचे गोचिड निर्मुलन आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी लालबहादूर दूध संस्थेचे चेअरमन वाय.सी.खोत, यशोधा महिला दूध संस्थेच्या चेअरमन मनिषा पताडे, भावेश्वरी दूध संस्था चेअरमन भास्कर खोत, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवसथापक डॉ.यु.व्ही.मोगले, राजू खोत, शिवाजी डोंगळे, संदीप ढेकळे, एल.के.खोत,अशोक खोत, द.ग.पताडे, युवराज सुतार,आर.डी.खोत आदी उपस्थित होते.