टोप ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसाने गुरुवारी रात्री जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मनपाडळे (ता. हातकणंगले ) येथील जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर एकमध्ये शेजारून जाणारा ओढ्याचे जोरदार पाणी शिरले आणि शाळेच्या प्रांगणासह वर्ग खोल्यात सुमारे दोन ते तीन फूट पाणी साचले. पाणी मराठी शाळेच्या समोरील मैदानावर साचून शाळेच्या इमारतीत घुसले.

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन ओढे वाहतात शुक्रवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे या ओढ्याचे पाणी शाळेच्या प्रांगणात शिरले. पावसाचा जोर वाढल्याने पावसाचे पाणी शाळेचे कार्यालय, शिक्षक कक्ष आणि वर्ग खोल्यांमध्ये सुमारे दीड ते दोन फूट इतके होते.नाले अरुंद असल्यामुळे तसेच आजूबाजूच्या डोंगर व शेतीस परिसरातील पाण्यामुळे प्रवाह अधिकच वाढला होता.

सध्या या इमारतीचे निर्लेखन करून घेतले असून नवीन चार वर्ग खोल्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला असल्याचे सरपंच रायबाराज शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे यांनी सांगितले