कुरुंदवाड (प्रतिनिधी) : अजित पवारांनी ईडीच्या भितीने गद्दारी केली. राज्यात आणि देशात शरद पवार यांना मानणारी जनता आहे. त्यामुळे आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करायचा आहे. लवकरच जनतेच्या भरवशाचं सरकार निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी केले. ते शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदधिकारी नियुक्ती मेळाव्यात बोलत होते.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी माने म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी जिल्हयात कार्य सुरु आहे. बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजेत. या माध्यमातूनच घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोहचवणार असल्याचे सांगून शरद पवार यांनी महिलांना आरक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मागे जिल्ह्यातील महिला उभ्या राहणार आहेत.


प्रांतिक सदस्य मदन कारंडे म्हणाले, शरद पवारांनी देशासाठी आणि राज्यासाठी मोठे कार्य केले आहे. शरद पवार यांना बाजूला ठेवून जे सोडून गेले ते गद्दार ठरले. आज सर्वसामान्य जनता शरद पवार यांच्याबरोबर आहे. त्यामुळे बाजूला गेलेल्यांना जनताच कायमचं बाजूला करेल.


यावेळी शिरोळ तालुका विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार, कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी आलासे, चंद्रकांत जाधव, बी.जी.माने, निता पाटील, गणेश जाधव,सादिक अत्तार,हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव,उपसरपंच हयाचांद जमादार, चंद्रकला पाटील, सुभाष देबाजे, पांडुरंग गायकवाड आदी उपस्थित होते.