मुंबई : गांधी घराण्याचे वारस आणि काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार राहुल गांधी यांच्या विवाहाच्या चर्चा काही थांबता थांबेनात. राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलंय. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून प्रणिती शिंदे आणि खासदार राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत. या अफवांच उगमस्थान काय हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही. प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील काँग्रेसचा तडफदार युवा चेहरा म्हणून ओळखल्या जातात. यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही राजकीय विश्लेषक या विषयावर चर्चा करतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल आणि प्रणिती एकत्र चालतानाचे काही फोटोही मॉर्फ करुन शेअर करण्यात येत आहेत. मात्र याबाबत दोन्ही परिवारांपैकी कुणीही भाष्य केलेले नाही.

माजी गृहमंत्र्यांच्या कन्या

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रणिती या कन्या असून त्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. 43 वर्षीय प्रणिती शिंदे या सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.