संविधान वाचविण्यासाठी, हुकुमशाही रोखण्यासाठी यंदाची निवडणूक महत्वाची

गडचिरोली : यंदाची लोकसभा निवडणूक आम्ही एकतर्फी मानतो. भाजपाचे लोकसभा उमेदवार अशोक नेते यांचा सर्व्हे भाजपने केला आहे. अशोक नेते जिंकू शकत नाही असा त्यांचा सर्व्हे आहे. म्हणून भाजपाने दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी केली होती. पण तरीही भाजपाला विजय होईल असा उमेदवार गवसला नाही म्हणून भाजपाने पुन्हा जुन्याच बैलाला जुंपले आहे. आम्ही डॉ. किरसान यांना उमेदवारी दिली आहे. ते नक्की जिंकणार याची खात्री आहे. डॉ किरसान यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड उत्साह दिसत होता. हा उत्साहच काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांच्या विजयाचे पहिले पाऊल आहे, असा विश्वास व्यक्त करत विजय वडेट्टीवार यांनी भाजपाची पोलखोल केली.

गडचिरोली येथील काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी वडेट्टीवार बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसला इन्कम टॅक्स नोटीस मिळाली. विरोधक संपवण्यासाठी या कारवाया सुरू आहेत. मी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा म्हणालो होतो की पुतीन यांनी रशियात विरोधक ठेवले नाहीत. त्यांनी विरोधक मुक्त रशिया केला. चीनने राष्ट्राध्यक्ष हा मरेपर्यंत राहील असा ठराव करून घेतला. अशी प्रवृत्ती सध्या आहे. लोकशाही दाखविण्यापूर्ती निवडणूक असेल. पण विरोधक नसेल. हुकुमशाही असेल. संविधानाची पायमल्ली होईल. त्यामुळे यंदाची निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक या देशातील शेवटची निवडणूक असेल. सध्या अघोषित आणिबाणी आहे. गोडसेंच्या विचारांना देशात थारा द्यायचा नाही. शेतकरी देशाच्या राजधानीच्या सीमेवर मरतात पण कोणी दखल घेत नाही. महिला कुस्तीगीर या भाजपाच्या खासदार विरोधात आरोप करतात पण सरकार कारवाई करत नाही. बिल्कीस बानो प्रकरणी दोषी असलेल्यांचे स्वागत केले जाते. देशातील उद्योग मर्यादित लोकांच्या हातात जात आहे.

देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिराजी गांधी यांनी जे निर्माण केले ते यांनी विकले. रुपयाचे अवमूल्यन भाजपामुळे झाले. या देशासाठी इंदिरा गांधी यांनी प्राणांची आहूती दिली. देशाचे तुकडे होऊ नये म्हणून त्यांनी बलिदान दिले. माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या देहाचे तुकडे झाले. हा त्याग आहे. सत्ताधारी आयत्या बिळावर नागोबा आहेत. सध्या बनवा बनवी सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या की, प्रभू रामचंद्राचे नाव घेतले जातचे. युवकांच्या हाताला काम नाही. रोजगार संपला आहे. उद्योग बंद पडले आहेत. गडचिरोलीमधील लढत ही एकतर्फी आहे. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार, असा विश्वास श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला. महागाई वाढली आहे. घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काही सूट दिली असली तरी निवडणूक झाल्यावर पुन्हा किंमती वाढणार आहेत. भाजपला संविधान बदलायचे आहे. हे संविधान वाचविण्यासाठी आपल्याला लढले पाहिजे, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.