कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरण, अंतर्गत गटर्स कामासाठी 45 कोटी, दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकांमासाठी 16 कोटी, शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथे संरक्षक भिंतीसाठी 1 कोटी रुपये, असे एकूण 62 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी, शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याचे मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स करणे तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले होते. रुग्णांना व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांची गेली अनेक दिवस नवीन इमारत बांधकामासाठी वारंवार मागणी होती, तसेच शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथील संरक्षक भिंत बांधणे कामीही मागणी होती. त्यामुळे आपण राज्य शासनाकडे या सर्व कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या हिवाळी अधिवेशनात या सर्व कामांना निधी मंजूर करण्यात यश आले तसेच या कामी राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य मिळाले आहे.

शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामासाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता, येथून पुढील काळात देखील तालुक्यातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करताना विकास कामासाठी शासनाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात निधी आणणार असल्याचेही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.