मुंबई ( प्रतिनिधी ) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कधी उन्हाचा ताव वाढतो, कधी थंडीची हुडहुडी भरते तर काही अवकाळी पाऊस थैमान घालतो. मात्र आता पाऊस थांबल्याने मुंबईसह राज्यात थंडीची लाट वाढत आहे.

खान्देश आणि नाशिकमधून थंडीची तीव्रता हळूहळू वाढल्याने पुढील 10 दिवस राज्यभर थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र, मंगळवार, 10 डिसेंबरपासून विदर्भात थंडीच्या लाटेचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला असून, त्यामुळे राज्यभरातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्राला याचा फटका बसला असून, आता संपुर्ण राज्यात पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरणार असल्याची शक्याता ही वर्तवण्यात येत आहे. आज, मुंबई आणि कोकण विभाग वगळता राज्यातील बहुतांश भागात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.