आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील कानोली येथील ऐन दसऱ्याच्या सणात आपगे कुटुंबातील कर्ता आणि शरीराने अपंग असणारा रोहिदास उर्फ देवदास सखाराम आपगे याचे अल्पशा आजाराने ऐन खंडेनवमी दिवशी निधन झाले. त्यामुळे रोहिदासची आई घरी एकट्या पडल्या. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखिची असल्याने रोहिदासच्या वर्गमित्रांना त्याच्या कुटुंबाची वानवा समजली आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला.
रोहिदासच्या वडिलांचे निधन त्यांच्या लहान वयातच झाले. त्यातच शरीराने अपंग असूनही घरची परिस्थिती सांभाळली. घर खर्च चालवण्यासाठी रोहिदासने वयाच्या १८ व्या वर्षी गावं सोडले आणि हॉटेलमध्ये कामाला सुरवात केली. प्रसंगी त्याने कुक म्हणूनही हॉटेलमध्ये काम केले. मात्र, असाच दिनक्रम चालू असताना त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर ऐन खंडेनवमी दिवशी रोहिदासचे निधन झाले. त्याच्या घरची परिस्थिती हालाखिची आणि गरिबीची असल्याचे २००१ सालचे १० वीच्या वर्गमित्रांना समजली. त्यांनी सोशल मीडियावर अहवान करून १८ हजारांची आर्थिक मदत जमा केली.
तसेच ही जमा झालेली रक्कम आज (रविवार) रोहिदासची आई श्रीमती तानुबाई आपगे यांचेकडे सरपंच सुषमा पाटील यांच्यामार्फत त्यांना सुपूर्द केली. ही रक्कम स्वीकारताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाल्याने सारे वर्गमित्रही हळहळले. एकीकडे गेट टूगेदर करून पैसा खर्च करणारे वर्गमित्र आणि परिस्थिती जाणून आर्थिक मदत करणारे वर्गमित्र याची आज प्रकर्षाने जाणीव झाली. यानिमित्ताने आजच्या जगात जात-पात धर्मापेक्षाही माणुसकी सर्वश्रेष्ठ असल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी वर्गमित्र नाना गोरे, आप्पा पाटील,नेताजी रेडेकर, प्रवीण पाटील सचिन सुतार सचिन नलवडे,युवराज देसाई तबारक बागवान,प्रवीण आगलावे,प्रवीण पाटील,सुरज देसाई,संदीप सालगुडे,संतोष रेडेकर,साईनाथ परब शरद कांबळे,वैभव मुरुकटे शुभांगी रेडेकर यांच्यासह वर्गातील अनेक मित्र-मैत्रिणींनी आर्थिक मदत केली.