कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : देवगड एसटी आगाराला बीएस-६ दर्जाच्या चार एसटी गाड्या प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून देवगड आगारातील बसगाड्यांची भेडसावणारी कमतरता काही प्रमाणात दूर होणार आहे.
देवगड व विजयदुर्ग एसटी आगाराला लांबपल्ल्याच्या गाड्या चालवाव्या लागतात. सर्वात जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या देवगड आगारातून सुटतात. तर विजयदुर्ग आगाराने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच पुणे मार्गावर लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या आहेत. देवगड एसटी आगाराला नव्या एसटी गाड्या मिळाव्यात, यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस साटम यांनी पालकमंत्री राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार देवगड आगाराला बीएस ६ दर्जाच्या चार गाड्या प्राप्त झाल्या असून येत्या काही दिवसात अजून सहा नव्या एसटी गाड्या मिळण्याची शक्यता आहे. देवगड आगाराला एकूण १५ गाड्यांची आवश्यकता आहे. दरम्यान, देवगड एसटी स्थानकातून पहाटेची पणजी, रत्नागिरी व उमरगा या बसपफेऱ्या पुन्हा सुरू करीत असल्याची माहिती देवगडचे आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी दिली आहे .