कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील एका नामांकित डॉक्टरविरोधात चंदगडमधील साडेपाचशे एकर सरकारी जमीन हडप केल्याबद्दल चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्याच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून ‘संबंधित डॉक्टर ‘वगळता इतर सहाजणांना मात्र अटक करण्यात आली आहे. या सहाजणांपैकी काहीजण पोलीस कस्टडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहेत.

चंदगड तालुक्यातील सडेगुडवळे या गावातील जवळपास साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप करण्यात आली असून यामध्ये एका तलाठ्याचा आणि रेकॉर्ड विभागातील एक कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. यातील साडेतीनशे एकर जमीन मुख्य सूत्रधार असलेल्या डॉक्टरच्या नावावर आहे. तर दोनशे एकर जमीन एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर आहे. या डॉक्टरचे कोल्हापूर शहरात मेंदू विकारावरील उपचाराशी संबंधित नामांकित हॉस्पिटल आहे. हा डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये बिनधास्तपणे व्यवसाय करत आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई कधी होणार याबाबत माहिती देण्यास मात्र तपास अधिकारी टाळाटाळ करत आहेत.

गुन्हा दाखल होऊन या डॉक्टरच्या इतर सहकाऱ्यांना अटक झाली आहे. मात्र संबंधित डॉक्टरवरील अटकेची कारवाई अटळ असली तरी पोलिसांकडून मात्र याबाबत गोपनीयता पाळली जात आहे. याचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक काळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

चंदगड तालुका हा डोंगराळ भाग म्हणून समजला जातो. त्यामुळे तालुक्यात हजारो हेक्टर शासकीय जमीन पडीक आहे. काही तलाठ्याना हाताशी धरून जमिनी लाटण्याचा प्रकार चालू असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे पडीक असलेली शासकीय जमीन किती जणांनी हडप केली याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा आहे.