कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : खत विक्रेत्यांनी खताची विक्री करताना शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करु नये तसेच खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्या आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत निविष्ठा सनियंत्रण आणि अन्य बैठका पार पडल्या, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जिल्ह्यातील निविष्ठा विक्रेत्यांना खत पुरवठा करताना कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे लिंकिंग करु नये, तसेच मुख्य खतांसोबत इतर कोणतेही दुय्यम उत्पादन विक्री होवून लिंकिंगचा चुकीचा संदेश जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. खत उत्पादक कंपनीने खत विक्रेत्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करावा. शेतकऱ्याने कोणते खत खरेदी करावे याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यालाच राहील, याची दक्षता खत उत्पादक कंपन्या आणि खत विक्रेत्यांनी घ्यावी.
शेतकऱ्यांच्या इच्छे व्यतिरिक्त कोणत्याही खताची खरेदी बंधनकारक नसल्याच्या आशयाचे बॅनर बनवून खत उत्पादक कंपन्यांनी खत विक्रेत्यांमार्फत या बाबीचा प्रचार, प्रसार करावा. कृषी विभागाने खत उत्पादक कंपन्या, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते या सर्वांचा मागणीनुसार पुरवठा होत असल्याची तपासणी करावी. खत वाहतुकीविषयीचे प्रश्न तसेच शासन स्तरावरील प्रश्न खरीप बैठकीवेळी पालकमंत्री यांच्याकडे मांडण्यात येतील. सर्व कृषी सेवा केंद्र धारकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. कृषी विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खत उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांची बैठक घेऊन जिल्ह्यात सर्व तालुक्यांना सम प्रमाणात खताचा पुरवठा होईल, याची खबरदारी घ्यावी.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. पोलीस उप अधिक्षक सुवर्णा पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संभाजी शेणवे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.