असित बनगे (कोल्हापूर) : आईबद्दल सगळेच लिहितात पण बापाबद्दल कोणीच काही लिहीत नाही. आईच वर्णन खूप लेखकांनी, कवींनी वेगवेगळ्या सुंदर शब्दात केले आहे. पण बाप नेहमीच या सगळ्यापासून अलीप्त राहिला आहे.आयुष्याच्या पडद्यामागचा मुख्य कलाकार म्हणजे बाप .बाप कधीच काही बोलत नाही. कधीच कोणतीच तक्रार करत नाही. नुसत्या सर्व जबाबदाऱ्या मुकाटपणे पार पाडत असतो.

मुलांना बापाबद्दल नेहमी धाक वाटत असतो. पण त्याच बापाचं प्रेम कधीच दिसत नाही. बाप ओरडतो, मारतो पण त्याच बापाची काळजी, आत्मीयता कधीच मुलांना दिसत नाही. खरेच, दिसेलही का ? बापाला कधीच स्वतःला हे दाखवायला आवडत नाही. म्हणूनच कदाचित मुले आपल्या बापाला कायम गृहीत धरतात. बाप नेहमीच मुलांसाठी त्यांच्या चांगल्या उज्वल भविष्यासाठी झटत असतो.

बाप कोणताही असो, तो कष्टकरी शेतकरी असो किंवा नोकरदार असो प्रत्येक बापाला त्याच्या पाल्याच्या भविष्याची चिंता असतेच. त्यासाठीच तो उन्हातान्हात राबत असतो. बाप मुलांसाठी इतका झटतो कि त्याला स्वतःची चिंताच उरत नाही. मुलांच्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभा राहतो तो बाप. ‘मी कायम तुझ्या सोबत उभा आहे तू हो पुढं’ असा विश्वासच नाही तर आत्मविश्वास देतो तो बाप. आपला मुलगा चुकणार नाही हा विश्वास बापाला असतो. मुलगा जरी चुकला तरी त्याला प्रत्येक संकटातून सुखरूपपणे बापच बाहेर काढतो.

एका विशिष्ठ कालावधीनंतर बाप मुलांचा मित्र, सखा बनतो. मित्र बनून बाप मुलांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण बापाला मात्र समजून घेणारं कोणी नसतं. आधी संसाराची जबाबदारी नंतर मुलांची जबाबदारी. बापाला स्वतःच असं आयुष्य काही नसतंच. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तो स्वतःची स्वप्ने मात्र मनाच्या एका कोपऱ्यात तशीच सारून ठेवतो. इच्छा असूनही कुटुंबामुळे, कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याला त्याच्या स्वप्नांपासून दूर रहावं लागत.किती तो त्याग?
मुलांच्या आयुष्यात आई दिवा असते तर बाप मशाल बनतो. मुलांना कधीच तो एकटा पडू देत नाही. मुलाच्या संपूर्ण आयुष्याची बांधणी म्हणजे बाप असतो.

मुलांच्या आयुष्याला आकार देणारा तो बाप असतो. मुलांची सावली बनून क्षणोक्षणी संकटात उभा ठाकणारा तो बाप असतो. मुलगी म्हणजे बापाचं काळीज असते. मुलगी जेंव्हा सासरी जात असते तेंव्हा हाच बाप ढसाढसा कुठल्यातरी कोपऱ्यात रडत बसलेला असतो. इच्छा नसतानाही त्याला मुलीला निरोप द्यावा लागतो. काय अवस्था होत असेल त्या बापाची ?

अरे कितीबी येऊ द्या
कोणीबी येऊ द्या
होऊ द्या कितीबी राडा
भीत नाय आता कोणाला
समोर उभा ठाकलाय माझा ‘बा’
उभा ठाकलाय माझा ‘बा ‘

बाप तो बापच असतो. बापाची जागा उभ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. बाप म्हणजे काय हे उमगायला खरचं लईच अवघड हाय! अश्या या मुलांसाठी त्याच्या कुटुंबासाठी सतत आयुष्यभर झटणाऱ्या प्रत्येक बापास आज पितृदिनी आदरपूर्वक सलाम.