कडगाव-पाटगाव ( प्रतिनिधी ) : एक तर जीवावर बेतून रात्रंदिवस करावी लागणारी शेतीची राखण आणि त्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे मोठे नुकसान आणि मिळणारी शासनाकडून तटपुंजी मदत या सर्वाला कंटाळून अखेर कडगाव तालुका भुदरगड येथील शेतकऱ्यांनी कडगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तसेच विविध मागण्यांसाठी निवेदन दिले.

वन्य प्राण्यांकडून झालेली नुकसान भरपाई म्हणून एकरी एक लाख रुपये देण्यात यावेत, वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊ नयेत म्हणून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, वन्य हद्दीमध्ये परंपरागत असणारी घरे जमिनी प्रस्ताव देऊन नियमित करण्यात याव्यात, वासनोली धनगर वाडा येथील वन हक्क दावे दाखल करून घेऊन मंजूर करण्यात यावे, शेतकऱ्यांनी खंडाने केलेल्या जमिनी व वन हक्कातून मिळालेल्या जमिनीतील पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा पंचनामा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्यात यावा, वन विभागाकडून दिलेल्या गॅस सिलेंडरचे अनुदान त्वरित अदा करण्यात यावे व नवीन गॅस कनेक्शन देण्यात यावे, वन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास बंद करावा, शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडे तोडण्यास परवानगी देण्यात यावी, मौजे वास्नोली धनगरवाडा येथे लावलेल्या मेसकाठी तोडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे शेतकरी व वनपाल यांनी करावे त्यावर अन्य कोणत्याही अधिकाऱ्याची सही ची अट घालू नये, अशा विविध मागण्यांचे शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य यशवंत उर्फ बाबा नांदेकर, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यजित राव जाधव, मानसिंगराव पाटील, प्रकाशराव डेळेकर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई,बाळासाहेब भालेकर, जयसिंगराव पार्ट, मुन्ना महाडिक युवा शक्तीचे शशिकांत पाटील, मधुकर पाटील, दशरथ पाटील, धनाजी गुळंबे, बाजीराव गोजारे, कृष्णा चौगुले आदि आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.