दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या मालिका आणि चित्रपटांमुळे प्रत्येकाला वाटत असतं की, आपणही त्या नायक आणि नायिकांसारखं गोरं दिसावं यासाठी मग वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम वापरायला चालू करतात. ज्या कंपनी त्या फेअरनेस क्रीम बनवत असतात त्या कंपनी दावा करत असतात की, त्यांच्या फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा किंवा मग उजळ होतो. मात्र, असा दावा केलेल्या एका कंपनीला हे प्रकरण चांगलचं महाग पडलेलं आपल्याला पहायला मिळत आहे.

एका कंपनीने दावा केल्याप्रमाणे एका ग्राहकाने 79 रूपयांची फेअरनेस क्रिम विकत घेतली मात्र, त्या फेअरनेस क्रिममुळे त्याचा चेहरा काही गोरा झाला नाही. त्यामुळे त्या ग्राहकाने त्या कंपनीला न्यायालयात खेचले. न्यायालयाने सांगितले की, कंपनीने दावा केल्याप्रमाणे ग्राहकाची दिशाभूल झाली असून कंपनीचा दावा खोटा ठरला असल्याचं सिद्ध झालं.

काय आहे नेमकं प्रकरण..?

दिल्लीस्थित ग्राहक मंचाने हा निर्णय दिला आहे. ग्राहक मंचाने अनुचित व्यापार पद्धतींसाठी सौंदर्यप्रसाधन कंपनी इमामी लिमिटेडला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इमामीची ‘फेअरनेस क्रीम’ची जाहिरात दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप एका ग्राहकाने केला होता. ‘मध्य दिल्ली जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग’ इमामी लिमिटेड विरुद्ध त्यांच्या उत्पादन ‘फेअर अँड हँडसम क्रीम’च्या अनुचित व्यापार पद्धतींबद्दल तक्रारीवर सुनावणी करत होता.

दिल्लीस्थित ग्राहक मंचाने काय सांगितले..?

फोरमचे अध्यक्ष इंदर जीत सिंग आणि सदस्य रश्मी बन्सल यांनी 9 डिसेंबर रोजी आदेश दिला. कंपनीने क्रिमवर असलेल्या लेबलमधून जो दावा केला आहे, त्याचे परिणाम प्रत्यक्षात मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे मंचाने निर्णयात सांगितले. कंपनीने उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि लेबलवर, जलद गोरेपणा येण्यासाठी दिवसातून दोनदा चेहऱ्यावर आणि मानेवर क्लींजिंग करा, असे लिहिले होते. युक्तीवादात इमामी लिमिटेडचे म्हणणे आहे, की तक्रारदार हे सिद्ध करू शकत नाही की, त्याने सूचनांनुसार क्रीम वापरली आहे. त्यामुळे उत्पादनात कोणताही दोष नाही. मात्र, उत्पादन वापरल्यानंतर तक्रारदाराची त्वचा गोरी झाली की नाही याचा निष्कर्ष काढता येईल असे काहीही रेकॉर्डवर नाही, असेही मंचाने सांगितले आहे.