पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 मे रोजी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जीव गेला. या अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाला लगेचच जामीनही मिळाला होता. काल गृहमंत्री फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली. या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनीही हस्तक्षेप केला आहे. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. बिल्डर लॉबीला फडणवीस पाठीशी घालतात असा आरोप धंगेकरांनी केलाय.

धंगेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते. हा सगळा फार्स असू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांचं समाधान करण्याकरता ते आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला. पुणेकरांना दाखवणारा देखावा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्या रात्री बरीच माया जमा केली आहे. पोलिसांनी चुकीचा तपास केला. पुणे पोलिसांनी पैसे घेतले आणि एवढे पैसे घेतल्याशिवाय व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. विशाल अग्रवाल हा बिल्डर डीफॉल्टर आहे. प्रचंड प्रमाणात पुणे महापालिकेत या बिल्डरकडून पैसे येणे आहेत. विशाल अग्रवालसह अनेक बिल्डर भाजपाबरोबर काम करतात. ते चुकीचं काम करतात म्हणून ते भाजपाबरोबर संलग्न आहेत. गृहमंत्री फडणवीस या  लॉबीला पाठिशी घालतात, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय.