पुणे – पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी एक घटना घडली होती. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.आता या घटनेची गंभीर दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी आढावा घेतला. ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देतानाच स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रकरणावर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एका विधीसंघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्याठिकाणी अपघात केला. दोन लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत, या संदर्भात लोकांमध्ये संताप आणि नाराजी पाहायला मिळाली. या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलेलं आहे, पुढे काय? आणि अशा घटना घडू नये त्यासाठी काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई केली आणि हा जो मुलगा आहे 17 वर्ष 8 महिन्यांचा आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, अपघाताच्या प्रकरणात कलम 304 लावण्यात आलेला आहे. बाल न्याय मंडळानं वेगळी भूमिका घेतली. आरोपीला अडल्ट ट्रीट करण्याबाबत वेगळी भूमिका घेतली. बालहक्क मंडळाच्या ऑर्डरनुसारच पुढील कारवाई करणार. आरोपीला सज्ञान म्हणून ग्राह्य धरण्यासाठी अर्ज केला. पोलिसांनी सादर केलेला अर्ज कोर्टानं बाजूला ठेवला. या प्रकरणाला अतिशय गंभीर पणे पोलिसांनी घेतल आहे. हे सहन केलं जाणार नाही. न्याय निश्चित केला जाईल. नाकाबंदी करुन ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांना परवाना मिळाला आहे त्याचे नियम पाळत आहे की नाही याची ही तपासणी पोलीस आणि पालिका आणि उत्पादन शुल्क विभाग करेल.
जिथं त्रास होतो तिथं थेट कारवाई केली जाईल. पालकांना ही आवाहन आहे की त्यांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही. पालकांनी काळजी घेतली पाहिजे, आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल असं काम केलं पाहिजे. बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात वरील कोर्टात दाद मागणार. आरोपीची सहज सुटका होणं हे सहन केलं जाणार नाही. ज्युविनैल जस्टिस बोर्ड जी ऑर्डर देईल त्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल. आम्हाला विश्वास आहे की नक्कीच रिमांड मिळेल असे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.