मुंबई ( प्रतिनिधी ) : बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात दाभाडेंनी ट्रॅक्टरमधून जबरदस्त एंट्री करत सर्वांसोबत धमाल केली. या सोहळ्याला क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह दाभाडे कुटुंबाचा भाग असलेले अनेक जण उपस्थित होते.
‘फसक्लास दाभाडे’च्या घोषणेपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यात आता ट्रेलरने भर टाकली आहे. ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबातील सदस्यांची आंबट गोड केमिस्ट्री पाहायला मिळत असून तायडी, सोनू आणि पप्पू यांच्यातील मजेदार नोकझोक दिसत असतानाच त्यांच्यातील भावनिक नातंही उलगडत आहे. विनोदासह हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली दाभाडे कुटुंबाची कहाणी पाहाण्यासाठी प्रेक्षक आता खूप उत्सुक आहेत.
‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
फसक्लास दाभाडें’चे हे कुटुंब 24 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.