कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील ऑटोरिक्षा आणि मिटर्स टॅक्सी चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

या मंडळाकडून केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ यांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जीवन विमा आणि अपंगत्त्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (50 हजार रुपयापर्यंत), पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृध्दी योजना आदी योजनांचा समावेश आहे.

तसेच या मंडळाच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सद्यस्थितीस नोंदणी अर्जाचे शुल्क, वार्षिक सदस्यत्वाचे शुल्क स्वीकारण्याची कार्यपध्दती राज्यस्तरावर निश्चित नसल्याने फक्त अर्जदाराचे अर्ज परिवहन कार्यालयाच्या स्तरावर स्वीकारण्यात येत आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

या कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असून जिल्ह्यातील ऑटोरिक्षा आणि मिटर्स टॅक्सी चालकांकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरस्तरावर जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळाची रचना करण्यात आली आहे.

24 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी मंडळाची कार्यपध्दती, कामकाज नियमावली निश्चित केली आहे.