मुंबई : अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती वाटते. सध्या इंग्रजी भाषा बोलता येणं आणि लिहता येणं महत्वाचे आहे. पण लहानपणापासूनच मराठी भाषेत शिक्षण घेणाऱ्या बहुतांशी विद्यार्थ्यांना कॉलेज जीवनात इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे कठीण जाते. मात्र आता विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गाकरिता दोन भाषा विषयांसह एकूण आठ विषय घेता येणार आहेत

लहानपणापासूनच मराठी भाषेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीमध्ये मात्र हे इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे कठीण होते. पण इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता चिंता करण्याची करण्याची गरज नाही. कारण राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून इंग्रजीवरील सक्ती काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची सक्ती नसणार, हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. अकरावी आणि बारावीला दोन भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दोन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही दोन भाषा निवडण्याची मुभा असेल. दोन भाषांव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची संधी असेल. वैकल्पिक भाषा निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य अशा शाखांमधील साचेबद्ध बंधन नसेल. ‘गट एक’मध्ये २६ भाषांमधून दोन विषय निवडावे लागतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नव्या आराखड्यात परदेशी भाषांमध्ये इंग्रजी भाषेचा समावेश केला आहे. त्यामुळे या भाषेचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करायचा की नाही, हे पूर्णतः विद्यार्थ्यांवर अवलंबून असणार आहे. ज्यामुळे आता अकरावी, बारावीला सध्या असलेले इंग्रजीचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. इंग्रजी भाषा अनिवार्य नसेल असे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. राज्याचा अभ्यासक्रम आराखड्यात 11वी-12वी इयत्तांना इंग्रजी अनिवार्य नसेल. तर, वैकल्पिक भाषा निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य अशा शाखांमधील विद्यार्थ्यांना साचेबद्ध बंधन नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना 26 भाषांमधून दोन विषय निवडावे लागतील.

त्या 26 भाषा कोणत्या?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नव्या आराखड्यात 17 भारतीय भाषा आणि 09 परदेशी भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी, पाली, अर्धमागधी, प्राकृत, अवेस्ता पहालवी या मूळ 17 भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तर इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी, स्पॅनिश, चायनीज, पर्शियन, अरेबिक या 09 परदेशी भाषांचा समावेश करण्यात आला आहे.