ठाणे (प्रतिनिधी) : बदलापूर शहरातील नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे . या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात , इतर तपासाच्या , वैद्यकीय बाबींमध्ये इतकेच नव्हे तर आरोपीला पकडण्यात बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे आणि पोलिस प्रशासनाने विलंब केल्याचा आरोप काही सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मंगळवारी सकाळी बदलापूर स्टेशनवर हजारो महिलांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनी लोकल ट्रेन रोखून धरल्या तसेच रिक्षा चालकांनीही रिक्षा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

अविनाश जाधव यांनी कोणती मागणी केली ..?


घडलेली घटना ही खूपच वाईट घडली .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या कित्येक दिवसांपासून या घटनेचा पाठपुरावा करत होत्या. अशी मानसिकता असणाऱ्या लोकांचा जागीच एन्काऊंटर झालाच पाहिजे. गृह खात्याने शिक्षा दिली पाहिजे ,जागीच ठार केले पाहिजे .लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिम्मत नाही झाली पाहिजे .लहान लेकरांवर हात टाकणार असाल तर तुमचा एन्काऊंटर निश्चितच होईल ,अशी भीती आरोपींच्या मनात बसायलाच हवी .आरोपीला एका वर्षाच्या आत फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ,अशी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.