दिल्ली (प्रतिनिधी) : अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक झाली तर ते घाबरतील, असे भाजपला वाटू शकते पण आम्ही त्यांना घाबरत नाही. त्यांनी देशवासीयांना ओळखले नाही. भारतात कोणी घाबरत नाही, आम्ही लढणारे आहोत. केंद्रीय संस्था त्यांच्यासोबत आहेत, आम्ही इंडिया आघाडी स्थापन करून आलो आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर भाजपच्या लोकांना बॅनरवर लिहून दाखवा की भाजपसोबत ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे तीन पक्ष आहेत. एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी घातक ठरले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज दिल्लीत सभा झाली.या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. इंडिया आघाडीच्या वतीने ‘भारत वाचवा लोकशाही रॅली’काढण्यात आली.या रॅलीमध्ये ते सहभागी झाले होते. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला देश तुमच्यासोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, संमिश्र आणि सर्व राज्यांचा आदर करणारे सरकार आणावे लागेल. तरच देशाचा उद्धार होईल. आम्ही निवडणूक प्रचारासाठी आलो नाही, लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहोत. अरविंद केजरीवाल यांना आरोपी करून तुरुंगात टाकले. हे कसले सरकार ? भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना भाजपने वॉशिंग मशिनमध्ये ठेवले, त्यांना आंघोळ घालून मंचावर बसवले. तुम्ही त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू शकता ? असा प्रश्नही ठाकरे यांनी या सभेतून जनतेला विचारला आहे.

ही निवडणूक रॅली नाही. दोन बहिणी हिंमतीने लढत आहेत तर भाऊ कसा मागे राहणार (income tax). कल्पना सोरेन आणि सुनीता सोरेन, काळजी करू नका, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. आपण हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहोत, अशी भीती होती, मात्र ही भीती नाही तर हे सत्य झाले आहे. आम्ही निवडणूक प्रचारासाठी आलो नाही. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आले आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.