कळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी दसरा आणि नवरात्रोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय धामणीखोऱ्यातील विविध गावांतील कोरोना दक्षता कमिटी आणि देवस्थान समित्यांमार्फत घेण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने व ती पुन्हा वाढू नये यासाठी विविध सण आणि उत्सव साजरे करत असताना योग्य ती काळजी घेतली जात आहे. नवरात्रोत्सव काळात मंदिरांमध्ये अनेक भक्त नवरात्री बसतात. पण यावर्षी मंदिरात नवीन नवरात्री बसण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी सलग दोन वर्षे नवरात्री बसवले जाते त्याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत गेल्यावर्षीच्या लोकांना नवरात्री बसण्याची परवानगी आहे.
नवरात्रीच्या काळात कोणीही बाहेर गावच्या व्यक्तिंनी हळद आणू नये, माहेरवाशिणींनी देवाला नारळ, तेल घालण्यास येऊ नये. अशा विविध अटी गावोगावी पाळण्यात येणार असल्याचे ग्रामसमित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.