टोप ( प्रतिनिधी ) : शिरोली औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना पुलाची शिरोली ग्रामपंचायतीने सुमारे सव्वा कोटी रुपयांची तर टोप ग्रामपंचायतीकडून सुमारे ऐंशी लाख रुपयांची थकीत कर वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे उद्योजकांच्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिरोली औद्योगिक वसाहतीत पुलाची शिरोली, टोप आणि शिये ग्रामपंचायतीचा समावेश होतो. या ग्रामपंचायती आपआपल्या हद्दीतील कारखान्याची कर वसुली करत असतात. पण अनेक कारखानदारांनी कित्येक वर्षे संपूर्ण कर भरलेला नाही. त्यामुळे ही थकबाकी कोटींच्या घरात गेली आहे. थकबाकी वसुलीसाठी आणि आकारणी मध्ये तडजोड करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि उद्योजक प्रतिनिधी यांच्यामध्ये वारंवार बैठका झाल्या पण त्यामधून कोणताही तडजोडीचा मार्ग निघू शकला नाही. अखेर संबंधित ग्रामपंचायतींनी थकबाकी वसुलीसाठी लोकन्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतीकडून थकबाकीदार कारखानदारांना युद्धपातळीवर शुक्रवार सकाळपासून नोटीसा लागू करण्याची मोहीम राबविण्यात आली. या नोटिसा मिळताच उद्योजकांच्यातून हालचाली सुरू झाल्या. याबाबत सायंकाळी चार वाजता स्मॅक भवन येथे बैठक पार पडली. पण चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

दरम्यान याबाबत नोटीस धारकांना शनिवारी सकाळी अकरा वाजता पेठवडगाव येथील लोक न्यायालयात हजर राहून खुलासा द्यावा लागणार आहे. यामुळे उद्योजकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.