मुंबई : एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच राज्यातील काही भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. राज्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या वतीने सरकारकडे अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत.

राज्यातील दुष्काळाच्या स्थितीची माहिती देताना शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. आपल्याकडे देशात सर्वाधिक धरणं आहेत. मात्र संभाजीनगर येथील धरणात १० टक्के पाणी आहे, पुणे विभागातील धरणांमध्ये १६ टक्के पाणी आहे, नाशिक विभागातील धरणांमध्ये २२ टक्के आणि कोकणातील धरणांमध्ये २९ टक्के पाणी आहे. महाराष्ट्रात जी मोठी धरणं आहेत, त्यामध्ये उजणी धरणात सध्या उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे, मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ५.५० इतका जलसाठा आणि मांजरा धरणात ०.३४ टक्के आणि धाराशिव जिल्ह्यातील धरणांमध्येही शून्य टक्के पाणीसाठी आहे. नगर जिल्ह्यातील तिन्ही मोठ्या धरणांमध्ये ९ टक्के पाणीसाठी आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात पाण्याची स्थिती गंभीर आहे. १९ जिल्ह्यात पाण्याची टंचाई आहे. ७३ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत आहे. १५०० महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातल्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली. संभाजीनगरमध्ये १५६१ टँकरची मागणी आहे, पण पाणीपुरवठा कमी आहे,” अशी सविस्तर माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

तर प्रचाराच्या काळात दुष्काळी उपाययोजना करण्यात अडचणी होत्या. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश होते. मात्र आता प्रचार संपलाय, आता मदत करावी, अशी मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली. तसेच पुण्यातील कार दुर्घटना हा एक अपघात आहे. त्याला इतके राजकीय महत्व आहे, असे मला वाटत नाही,” असेही ते म्हणाले.

पवारांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या?
१. आता आपण मे महिन्याच्या अखेरीस आहोत आणि साधारण जुलै एंडपर्यंत पाण्याची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या ठिकठिकाणी निर्माण झाली आहे. संभाजीनगर विभागात १५६१ गावांमध्ये पाण्याची मागणी आहे आणि या विभागात १८३७ इतके टँकर सध्या आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर तेथील परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथं आवश्यकता आहेत तिथे टँकर सुरू करावेत.
२. शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, मात्र विमा कंपन्या हे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून या विमा कंपन्यांना योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे.
३. वीज बिलात सूट द्यावी. वीज बील वसुलीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही स्थितीत बिल भरले नाही म्हणून शेतकऱ्यांची वीज खंडित करू नये.
४. मनरेगाच्या कामात जे निकष आहेत ते शिथिल करावेत आणि जसं पूर्वी रोजगार हमी योजनेचे जे निकष राज्य सरकारने आणले होते त्याची अंमलबजावणी करावी.
५. जिथं जास्त दुष्काळ आहे, पिकं गेली आहेत, त्या भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे.
६. फळबागांचं नुकसान झाल्यानंतर अनुदान देण्याची पद्धत होती. ते अनुदान राज्य सरकारने आता देण्याची गरज आहे.
७. ज्या ठिकाणी पाणीप्रश्न गंभीर आहे, तिथं जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.