कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये आपल्याला चहा तर लागतोच. जागोजागी चौकाचौकात कट्ट्यावर मित्रांच्या बरोबर थंडीमध्ये चहा प्यायची मजाच वेगळी असते. पण हा चहा थेट कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही घेत असलेल्या चहामुळे नव्हे तर तुम्ही चहा प्लास्टिकच्या कपामध्ये त्यामुळे धोका होऊ शकतो. या कपाऐवजी काचेचा ग्लास किंवा चिनी मातीने बनवलेला कप वापरला जायचा मात्र आता त्या कपाची जागा प्लास्टिकच्या कपांनी घेतल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढलेला आहे.

कारण हा कप तयार करत असताना त्यामध्ये बीपीए नावाचे केमिकल वापरले जाते आणि हे केमिकल आरोग्याला हानिकारक असल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे. कागदी तसेच प्लास्टिक कपावर बंदी घालावी, हे कप बनवताना विषारी केमिकल्स त्यामधे वापरले जातात त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो यासाठी या कपांवर बंदी आणावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या प्लास्टिकच्या कपाने सगळ्या चहाच्या टपऱ्यांवर मोठे अतिक्रमण केले आहे. एवढेच काय चहा पिल्यानंतर तो कप फेकून दिला जातो आणि त्याचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणालाही धोका होऊ शकतो.