नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येऊन गेले. ते कशासाठी येतात हे सर्वांनाच माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जात आहे.  शिक्षकांना विकत घेऊ नका, परंपरा मोडू नका. जळगावला पैसे वाटप झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी व्हिडीओद्वारे केला. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर, शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका,अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  यांनी  व्हिडीओ शेअर करत केल्यानंतर  आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.  

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावरही निशाना साधलाय.निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. हा निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे वागत आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. 

डमी उमेदवाराची पद्धत बंद व्हायला पाहिजे –

दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य असणारा भगरे नावाचा उमेदवार विरोधकांनी  उभा केला होता. भास्कर भगरे यांच्या नावाप्रमाणे भास्कर भगरेला गुरुजी लावले नाही. तिसरी पास उमेदवाराच्या नावापुढे सर लावण्यात आले.  त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांची फसवणूक करून मत घेण्याचा प्रकार विरोधकांकडून झाला. डमी उमेदवाराची पद्धत बंद व्हायला पाहिजे.  लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली जातात.  यातून मार्ग काढावा लागेल. संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेटला दिलं जातं. लोकांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते मात्र धनुष्यबाणला मत दिली गेली.