टोप (प्रतिनिधी) : टोप वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ यांच्यावतीने संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री कल्लेश्वर मंदिर टोप येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे १४ ते १६ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या पारायणाचे ३ रे वर्ष आहे.

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे विद्यावंशज स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरु ह. भ. प. तात्यासाहेब वासकर महाराज आबा यांच्या कृपाशीर्वादाने ह भ प ऋषिकेश वासकर महाराज यांचे मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यामध्ये पहाटे ४ ते ६ अभिषेक व काकड आरती, ७ ते ११ श्री ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ, प्रवचन, ७ ते ९ कीर्तन असे नित्यक्रम होणार आहेत.

तर १४ रोजी ह भ प ऋषिकेश विठ्ठलराव वासकर यांचे प्रवचन व ह.भ.प.गोपाळ वासकर यांचे कीर्तन, १५ रोजी ह भ प ऋषिकेश विठ्ठलराव वासकर यांचे प्रवचन व बालकीर्तनकार हभप चैतन्य फुंदे (लातूरकर) यांचे कीर्तन, १६ रोजी हभप गजानन गनबावले यांचे काल्याचे किर्तन तर श्री माऊली अश्व, ज्ञानेश्वरी ग्रंथ, पादुकासह दिंडी, उभे व गोल रिंगण सोहळा टोप हायस्कूलच्या पटांगणावर संपन्न होणार आहे. यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय, ग्रामपंचायत, तसेच विविध सहकारी संस्था, दूध संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट, पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळे, भक्त, वारकरी, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.