टोप ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत गरीब गरजूंना रेशनधान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य तसेच रेशनकार्ड 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ चे बंधन घातले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. याशिवाय आशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिकादेखील रद्द केल्या जाणार आहेत. यामुळे ऐन दिवाळीत महिलांना घरात दिवाळी न करता रेशन धान्य दुकानदाराकडे धाव घ्यावी लागत आहे. सर्व्हर डाऊन आणि गर्दी मुळे तासानं – तास उभे राहावे लागत असून शासनाने याची मुदत वाढवावी अशी मागणी होत आहे. कारण महिलां दिवाळी करायची का ई – केवायसी अशा द्विधा मनस्थितीत आहेत. तर यामुळे घराघरात वादाचे प्रसंग घडत आहेत.

जिल्ह्यातील 12 तालुक्यातील धान्य दुकानदारांनी मुदत वाढीबाबत प्रशासनास कळवले असून याबाबत निर्णय लवकरच होईल अशी अपेक्षा धान्य दुकान संघटनेचे (हातकणंगले) अध्यक्ष श्रीपती पाटील यांनी केली आहे.