देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील शिक्षण प्रसारक मंडळ, महात्मा गांधी विद्यामंदिर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सनातन संस्था प्रकाशित ग्रंथांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले.
तळेबाजार हायस्कूलमध्ये सनातन संस्थेचे संदीप तळवडेकर आणि माजी मुख्याध्यापक नारायण हिंदळेकर यांनी सनातन संस्था प्रकाशित अभ्यास कसा करावा, टी.व्ही, भ्रमणभाष आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्हा, गुण जोपासा आणि दोष घालवा आदी ग्रंथ भेट देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक र.अं. घोगळे म्हणाले, ही अतिशय उपयुक्त अशी पुस्तके आहेत. याला लाभ विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनाही यांनाही होणार आहे. अशा पुस्तकांमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील. त्यांच्यातील वाचन प्रेरणा विकसित होईल. या पुस्तकातून चौफेर ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तळेबाजार हायस्कूलच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून हे ग्रंथ विद्यार्थ्यांना दिले जाऊन ते वाचल्यावर त्यांच्याकडून परत घेतले जातात आणि त्यानंतर पुन्हा दुसर्या मुलाला दिले जातात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे ग्रंथ पोचणार आहेत. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही ९० विद्यार्थ्यांना सनातन संस्था प्रकाशित रामरक्षा स्तोत्र आणि मारुतिस्तोत्र हे ग्रंथ वितरीत करण्यात आले. या वेळी प्रारंभी दोन्ही स्तोत्रांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक समीर कुडाळकर, स्नेहा कुडाळकर, सुष्मिता मिराशी आदी उपस्थित होते.