कुरुंदवाड (प्रतिनिधी) : पंचगंगा पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असून कुरुंदवाड शहरातील सकल भागामध्ये पाणी पसरले आहे. शिकलगार वसाहत गोठणपूर परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरले आहे. मात्र कुरुंदवाड शहरातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला होता. आज चक्क काही आज्ञातांनी “पाणी कुठवर आलं ग बाई साहेबांना नुसती मिटींगची घाई” या उल्लेखाचा बोर्ड लावल्याने हा विषय कुरुंदवाड शहरासह शिरोळ तालुक्यात चर्चेचा ठरला आहे.
हा बोर्ड लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुरुंदवाड नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये अगदी काही वेळातच जप्त केला आहे. दरम्यान आज शहरात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांचा ताफा कुरुंदवाड शहरात दाखल झाला होता . मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे त्याकडे लक्ष गेले नसले तरी या बोर्डाची चर्चा संपूर्ण शिरोळ तालुक्यात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अज्ञातांनी”पाणी कुठवर आलं ग बाई साहेबाला लागली नुसती मिटींगची घाई” असा डिजिटल फलक लावल्यामुळे शहरामध्ये डिजिटल फलक हा चर्चेचा विषय बनला. दरम्यान येथील गोठणपूर कोरवी गल्ली परिसरातील काही नागरिक प्रशासनाने आमच्या निवाऱ्याची सोय स्थलांतराची सोय केला नसल्याचा आरोप केला होता. आणि आज शनिवारी पालकमंत्र्यांचा ताफा येणार असल्याचे समजताच काही अज्ञाताने सदरचा बोर्ड लावल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात सदरचा बोर्ड जप्त केला आहे.