पुणे (प्रतिनिधी) : रविवारच्या गुकेशच्या सफाईदार विजयानंतर सोमवारी गुकेशने काळ्या सोंगट्या घेऊन खेळ केला. डिंग लिरेनने पांढऱ्या सोंगट्या घेऊन c4 ही खेळी करून डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने केली. गुकेशने त्यास e6 असे उत्तर दिले. गुकेशच्या B e6 या खेळीने बाराव्या खेळी अखेर दोघांची डाववाढ पूर्ण झाली. यावेळीसही गुकेश पुन्हा वेळेच्या तुलनेत तीस मिनिटांनी डिंग लिरेन पेक्षा आघाडीवर दिसला.
या खेळी अखेर पटावर दोघांनाही समान संधी दिसत होत्या. काल मिळालेल्या आघाडीमुळे आज गुकेशला बरोबरी साधली तरी समाधानकारक होते. मात्र पुन्हा मालिकेत बरोबरी साधायची असेल तर डिंग लिरेनला हा डाव जिंकणे आवश्यक होते. डिंग लिरेनच्या Q d2 या खेळीनंतर केंद्रस्थानावरचे त्याचे वर्चस्व वाढले, तर गुकेशचा Q d8 या ठिकाणी वजीर अडकून राहिला. या परिस्थितीत डावामध्ये प्रचंड गुंतागुंत निर्माण झाली. येथे विचार करून बचाव शोधण्यामध्ये गुकेशचा बराच वेळ खर्च झाला.
पुढे डिंगची प्रत्येक खेळी गुकेशवर दबाव वाढवत राहिली. गुकेशची कोणतीच मोहरी त्याच्या मदतीची येऊ शकली नाही. वेळेमध्येही तो मागे पडला. 35 व्या खेळीस d6 d5 ची पांढरी प्यादी, उंट, हत्ती आणि वजीर यांनी गुकेशचा बचाव पूर्णपणे मोडून काढला. 39व्या डिंग लिरेनच्या R g7 या खेळीमुळे गुकेशची पूर्णपणे कोंडी झाली आणि गुकेशला डाव सोडणे भाग पडले. डिंग लिरेनने आज कोणतीही चूक न करता गुकेशला अतिशय सुरेख पराभूत केले.
आता मालिकेत पुन्हा 6 – 6 अशी बरोबरी झालेली आहे. आज विश्रांतीचा दिवस आहे. स्पर्धेत अजून 2 डाव बाकी आहेत. स्पर्धेतील चुरस अजून बाकी आहे. एवढेच आता आपण सांगू शकतो, परंतु एक चांगली लढत आपणास बघण्यास मिळत आहे हे नक्की असे विश्लेषण बुद्धिबळ खेळाचे विश्लेषक धनंजय इनामदार यांनी केले आहे.