सांगली (प्रतिनिधी) : वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथील आदर्श करिअर अकॅडमीचे संस्थापक दिलीपराव देसावळे यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी (किंगडम ऑफ टोंगा) यांच्याकडून डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. किंगडम ऑफ टोंगाची डॉक्टरेट पदवी मिळवणारे दिलीपराव देसावळे हे पहिलेच ठरले आहेत.
आदर्श करिअर अकॅडमीच्या माध्यमातून देसावळे यांनी वीस हजारांहून अधिक तरुणांचे सैन्य भरतीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत त्यांना सैन्यदलात भरती केले आहे. देसावळे यांच्या कार्यामुळे आज अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे. तसेच या कुटुंबांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचे महानकार्यही देसावळे यांनी केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही आदर्श करिअर अकॅडमीला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
तसेच ‘कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे देसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श करिअर अकॅडमीने बहादुरवाडीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गावातील विविध सामाजिक उपक्रमांना आदर्श अकॅडमीने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. गावाची सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राची गरज भागवण्याचे काम आदर्श करिअर ॲकॅडमी करीत आहे. तसेच तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम देसावळे यांनी केले आहे.