मुंबई/प्रतिनिधी : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असताना शिवसेना उबाठा गटाने लोकसभेच्या १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर लगेच वंचित बहुजन आघाडीनेही नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. यातच प्रकाश आंबेडकर यांनी सवता सुभा मांडला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी यादी जाहीर केल्या नंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह पाच जागा देण्यास तयार झालो होतो. आज जर चर्चा पुढे गेली असती तर सहावी जागाही कदाचित त्यांना दिली असती. हे आम्ही तीन पक्षांनी ठरवलं होतं. काहीही झालं तरी प्रकाश आंबेडकर यांना आपल्याबरोबर घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं. ” तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.दरम्यान, संजय राऊत सातत्याने दावा करत आहेत की आम्ही (मविआ) वंचितला आमच्याबरोबर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर आमचा विश्वास आहे. आमचे आणि त्यांचे विचार सारखेच आहेत. आम्हाला देशाचं संविधान वाचवायचं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत होईल असं वागणार नाहीत. आमची प्रकाश आंबेडकरांशी अजूनही चर्चा चालू आहे.

संजय राऊत अजूनही आघाडी मजबूत असल्याचा दावा करत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत चाकू खुपसत आहेत असं चित्र दिसतंय. या फोटोसह प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार? तुम्ही म्हणताय की तुमचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत तर मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवत नाही? ६ मार्च रोजी फोर सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का केलं नाही? तुम्ही आजही वंचितला आमंत्रित न करता बैठक बोलावली आहे, आमच्याशिवाय बैठक का करताय?

प्रकाश आंबेडकर संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय, तुम्ही हे कसलं नातं निर्माण करत आहात. तुमचे विचार असे आहेत?