कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे. भारतासाठी स्वप्निलने या 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू हा बहुमान मिळवला आहे. स्वप्निलच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे यांच्या यशावर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी वक्त्यव्य केलेय
काय म्हणाले खासदार धनंजय महाडिक..?
धनंजय महाडिक म्हणाले, नेमबाजी क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या सुपुत्राने, ऑलिंपिक मध्ये कांस्यपदकाची कमाई केली. केवळ कोल्हापूरला नव्हे तर संपूर्ण देशाला स्वप्निल बद्दल अभिमान आहे. स्वप्निलच्या या उत्तुंग यशामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन आणि चालना देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच भारताचे खेळाडू विविध क्रीडा प्रकारात उतुंग कामगिरी करत आहेत. कोल्हापूरची शान असलेल्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. या खेळाडूला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य असेल. असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले.