मुंबई (प्रतिनिधी) : आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे. याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, याची खात्री आहे, असा विश्वास शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

शेतकरी आंदोलनावरुन देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आता हे उत्खनन करायचे म्हटले तर खूप लांबपर्यंत जाईल. आज देशात काय सुरु आहे. १० वर्षापूर्वीचे बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे, त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेले नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतेही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतले पाहिजे. त्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे.