दिल्ली (वृत्तसंस्था) : मी फडणवीस यांच्या जाण्या येण्याचा खर्च करतो. त्यांनी अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये जावं. कश्मिरी पंडित यांना भेटून याव. तसेच एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल चित्रपट काढावा, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्व्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात इंडिया आघाडीतील सहभागी पक्षांची आज रॅली होणार आहे. राज्यातून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर जोरदार निशाना साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, देशात हुकुमशाही येऊ पाहत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सोरेन, अरविंद केजरीवाल यांना अटक केली. या हुकुमशाहीचा सामना करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात असून माझे दौरे सुरू आहेत. सगळ्यांच्या मनात राग आहे, त्वेष आहे. जनता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे. या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.